🔶 संतवाणी
होऊ नको काही या मना आधीन।नाईके वचन याचे काही।।
हटीयाची गोष्टी मोडून टाकावी। सोई ही धरावी विठोबाची।।
आपुले आधीन करुनिया ठेवा।नाहीतरी जिवा घातक हे।।
तुका म्हणे जाले जे मना आधीन।तयासी बंधन यम करी।।
अर्थ:- मन कमालीचे चंचल असते त्याच्यावर आपले विवेकाचे नियंत्रण ठेवले नाही तर ते कुठेही भटकते, कसेही भरकटते. इंद्रियांवर आपल्या विवेकाऐवजी त्याचीच सत्ता चालू दिली तर, ते त्यांना स्वैरपणाने काहीही करू देते. मग माणसाचे स्वतःच्या वागण्यावर वा बोलण्यावर कशाचेही बंधन राहत नाही. आपल्या निर्णयाचे वा कृतीचे परिणाम काय होतील, याबाबतीत माणूस जणू काही मुका, बहिरा व अंध बनतो. याउलट माणसाने मनाला आपल्या अधीन ठेवले तर तो जिवनामध्ये प्रत्येक पाऊल उचलताना सावध राहतो. अमुक एक शब्द उच्चारावा की नाही, आशा प्रकरचा निर्णय घेतला तर तो आपल्या हिताचा ठरेल की नाही अशा बारीक सारीक गोष्टीतही तो जागरुक राहून आपला प्रवास करतो. असा मनुष्यच आपल्या ध्येयापर्यंत सुखरूप पोहचतो. म्हणून प्रत्येकाने मन नियंत्रीत केले पाहिजे. असे तुकाराम महाराज म्हणतात.

No comments:
Post a Comment