EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Tuesday, July 31, 2018

*सांडुनियां पंढरीराव 31/07/2018





*सांडुनियां पंढरीराव ।*
*कवणातें म्हणों देव? ।।१।।*
*बहु लाज वाटे चित्ता ।*
*आणिकांतें देव म्हणतां ।।ध्रु.।।*
*सांडुनियां हिरा ।*
*कोणें वेचाव्या त्या गारा? ।।२।।*
*तुका म्हणे हरिहर ।*
*ऐसा सांडुनियां धुर ।।३।।*

*अर्थ व चिंतन -*
*तेहतीस कोटींच्या यादीत नसलेले श्री विठ्ठल हेच एकमेव 'कर्मकांड विरहित सेवा करता येणारे' ईश्वर आहेत असं सर्वच संतांनी अगदी ठामपणे सांगितलं. राम, कृष्ण, गणपती, हनुमान आणि शंकर यांची चरित्रे पुराणांमध्ये उपलब्ध आहेत. तसं विठ्ठलावर पुराण असल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. राहिला विषय 'शेंदरी-हेंदरी-रंडीका-चण्डिका' देवतांचा, तर हे संतांच्या खिजगीणतीतही नाहीत.*

*या अभंगात मात्र तुकोबा आपलं सर्व लक्ष विठ्ठलाकडं देऊन आहेत. 'आपल्याच पोटाची काळजी वाहणाऱ्या आणि खळगी भरणाऱ्या देवता' या पावसात पडलेल्या गारा असून खरा हिरा हा विठ्ठल असल्याचं ते यात सांगतात.*

*तुकोबा म्हणतात, एक "पंढरीराय सोडले, तर मी (दुसऱ्या) कुणाला (कशाकरिता) देव म्हणू?" माझ्यासाठी देव म्हणाल तर एकच, तो म्हणजे पांडुरंग.*

*"इतरांना देव म्हणायला तर माझ्या मनाला फारच लाज वाटते."*

*अहो, पावसात पडलेल्या 'गारा'ही चमकतात आणि 'हिरा'ही चमकतो. पण गाराचं अस्तित्व काही क्षणापुरतंच. हिरा मात्र चिरकाल टिकणारा आहे. म्हणून, "हिरा सोडून देऊन त्या गारा कुणी वेचाव्या?" मी तरी गारांची निवड करणार नाही.*

*राहिला देवांच्या पुजानेचा प्रश्न, तर "सर्वात श्रेष्ठ देव 'विठ्ठल' सोडून कोण इतरांची पूजा करील?" मी पूजा फक्त विठ्ठलाची करतो.*

*आणखी एका ठिकाणी ते म्हणतात,*
*एक विठ्ठल चि खरा ।*
*येर तो पसारा वावगा चि ।।*
*"खरा तो एकमेव विठ्ठलच असून, इतरांचा उगाचच पसारा मांडून ठेवला आहे."*

*लोक खऱ्या वर्माला कसे चुकले आणि विठ्ठलाला सोडून इतरांनाच कसे भजायला लागले, याविषयी तुकोबा म्हणतात,*
*कामिकांची सेवा ।*
*लागोन मागोन 'खात्या' देवा ।।*
*अवघियांचा धनी ।*
*त्यासी गेलीं विसरोनि ।।*

*'लाच घेण्यासाठी त्रास दिल्याप्रमाणे' काही देव लोकांना आधी त्रास देतात आणि मग त्यांच्याकडून 'शांती, नारायण-नागबळी, सत्यनारायण, अभिषेक, इत्यादी' सेवा करून घेतात, ते 'कामिक' देव होय. त्यांना ईश्वर कसं म्हणता येईल? आणि नेमकं लोक या असल्या "कामिक देवांची सेवा करतात. तेही या सगळ्यांचा मालक 'विठ्ठलाला' विसरून!"*

*कसल्याही 'लाचेची' अपेक्षा न ठेवणारा आणि सगळ्याच देवांचा 'मालक' असलेला एकमेव खरा 'हिरा' म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. भक्ती करायची तर फक्त आणि फक्त त्याचीच.*


*चिंतन - विजय गवळी*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers