EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Wednesday, August 1, 2018

"गुरूकृपा"

"गुरूकृपा"


ती लांबलचक महागडी गाडी गल्लीच्या टोकावरच थांबली. त्या गाडीला सामावून घेईल इतकी अख्या गल्लीची ऐपत नव्हती. गाडीतून उतरणार्‍या त्या रुबाबदार माणसाकडे, गल्लीतील अनेकांप्रमाणे, आपल्या चाळीच्या गॅलरीत उभ्या असलेल्या वडके सरांनीही पाहीलं. इतका मोठा कोण माणुस आपल्या गल्लीत शिरतोय? याचं सरांसकट सगळ्यांनाच कुतुहल होतं.

त्या माणसाने गल्लीच्या टोकालाच चौकशी केली. कुणीतरी सरांच्या चाळीकडेच बोट दाखवलं. तो माणूस झपाझप चालत त्यांच्या चाळीत शिरला आणि काही मिनिटांमधे थेट सरांच्या समोरच येउन उभा राहीला. सर बघतच बसले. तो सहज वितभर उंच असावा सरांपेक्षा. अंगावर किमती सूट होता. बूट तर इतके चकचकत होते, की चाळीतल्या कुणाचाही आरसाही लाजावा !!

"सर, नमस्कार करतो." असं म्हणून तो चक्क सरांच्या पाया पडला. सर किंचित बावचळलेच. पण त्यांनी अभावितपणे आशिर्वाद दिलाच, "आयुष्मान भवं !" थोडं चाचरत सर म्हणाले, "माफ करा, पण मी तुम्हाला ओळखलं नाही." "सर प्लीज मला अहोजाहो करू नका. मी विद्यार्थी आहे तुमचा." तो ओशाळत्या स्वरात म्हणाला. "बरं.. तू म्हणशील तसं. ये आत ये." सरांनी त्याला खोलीत बोलावलं.

रंगाचे टवके उडालेल्या भिंती, खंगलेल्या कॉट वरील मळकट गादी, ठिबकणारा नळ, उडालेली कौलं अशा अवस्थेतील ती खोली देखील, संपत्तीचा वर्ख ल्यायलेल्या त्या माणसाला पाहून लाजल्यासारखी झाली असावी. पण त्याचं या कशाकडेही लक्ष नव्हतं. तो अनिमिष नेत्रांनी भिंतीवरच्या तसबिरींकडे पहात होता. सरांच्या बायको आणि मुलाच्या तसबिरी.

"सर तुम्ही मला ओळखलं नसेल. मी सुरेश, सुरेश मुकादम. नकट्या सुर्शा म्हणालो तर ओळख लागेल बघा. तुमचा बहुदा सर्वात द्वाड आणि वांड विद्यार्थी. आणि बहुदा असा एकमेव विद्यार्थी ज्याने तुमचा ढोरमार खल्ला होता. आठवलं का सर? चोरी केली होती मी... वर्गातल्याच एका मुलाच्या फी चे पैसे लांबवले होते. तुम्हाला कळलं तसं तुम्ही त्या दिवशी मला भर वर्गात फोडून काढलं होतं...

पण तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला सर. तुमची गुरूकृपाच झाली म्हणाना माझ्यावर. मी पार बदललो त्या दिवसापासून. तुम्ही म्हणाला होता, "मला परत कळलं की तू कुठे वाईट वागलास तर मी तिथे येउन जीव घेईन तुझा" ते वाक्य कायम माझ्या सोबत राहिलं सर. अपार मेहेनत घेतली त्या नंतर...." सुर्शा भरभरून बोलत राहीला आणि वडके सरांचे चश्म्याआडचे डोळे डबडबून आले. त्यांचा घसा दाटून गेला. कानावर पडणारे स्तुतीचे शब्द ऐकू येईनात. तेव्हाच त्यांना तो दिवस अगदी स्पष्ट आठवला !! सर भानावर आले.

"सर आज माझ्याकडे आहे ते सगळं तुमच्यामुळे आहे ! तुम्ही चला माझ्यासोबत..." सरांनी हात उंचावून त्याच्या शब्दांचा धबधबा थांबवला. किंचीत घसा खाकरून ते म्हणाले, " सुरेश, अरे यात माझा काही हात नाही रे. देता नाही आणि मारताही नाही. तूला चांगलं वागायला एक धक्का हवा होता फक्त आणि नियतीने तो द्यायला केवळ माझ्या हातांचा वापर केला इतकच ! बाकी तुला जे फळ मिळालं आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्या स्वकर्तृत्वाचं आहे हे नक्की. त्याचं श्रेय मला देउन माझ्यावर नको ते ओझं नको टाकूस. अजून काय सांगू? चांगला वागत रहा. होईल तितकी इतरांना मदत कर. बास. तू आठवण ठेउन भेटायला आलास हेच खूप आहे माझ्यासाठी हो" सरांच्या या बोलण्याने भारावून जात सुरेश परत त्यांच्या पाया पडुन निघून गेला.

तो गेला तरी सर बराच वेळ बसल्या जागी स्तब्ध होते. अंधार दाटायला लागला तसे ते बसल्या जागेहून उठले. तसबिरींपुढे सरांनी दिवा उजळला. प्रकाशाने सरांच्या बायकोची तसबीर अगदी उजळुन निघाली. सर तसबिरीतल्या त्यांच्या बायकोला म्हणाले, " मास्तरीणबाई, मी सुरेशला मारलं तो कोणता दिवस होता ठाउक आहे का? आपल्या श्रीहरीने पहिली चोरी केली होती तोच दिवस होता तो. शाळेतल्या मास्तराच्या मुलाने केलेली चोरी ! मी अंतर्बाह्य हादरलो होतो. सत्य फक्त मलाच माहीती होतं. तुमच्यापासूनही मी दडवलं ते ! लाजेखातर आणि भीडेखातर त्याला पाठीशी घातलं मी. पांघरूण घातलं त्याच्या गुन्ह्यावर.

पण मस्तक नुसतं भणभणत होतं. त्याच वेळेस हा सुर्शा समोर आला. चोरीच्याच आरोपावरून. माझा ताबा सुटला स्वतःवरचा ! मी जबरदस्त फोडून काढला त्याला. मी मारत त्याला होतो पण माझ्या डोळ्यांसमोर आपला श्रीहरीच होता !! जे मी माझ्या स्वतःच्या मुलासोबत करायला हवं होतं, ते मी माझ्या विद्यार्थ्यासोबत केलं. त्याचं आयुष्य सुधारलं या गोष्टीने असं म्हणतोय तो. आपला श्रीहरी कधी सुधारलाच नाही ! तिथुन तो वहावतच गेला... पुढे जाउन शुल्लकश्या मारामारीत जीव गमावेपर्यंत !!

सुर्शाला मार्गावर आणणारा, गुरू म्हणवून घ्यायचा हक्क नसलेला, गुरू त्याला भेटला. पण माझ्या थोबाडीत मारून "श्रीहरीला पाठीशी घालणं कसं चुकीचं आहे" हे दरडावणारा गुरू मला त्या क्षणी का भेटला नाही हो मास्तरीणबाई? माझा श्रीहरीही सन्मार्गाला लागला असता का हो त्याने? ते न करून स्वतःच्या पोराचा एकाअर्थी जीवच घेतला का हो मी? सांगा ना मास्तरीणबाई... सांगा ना?"

हुंदक्यांनी गदगदणार्‍या सरांचं सांत्वन करण्याइतकी त्या तसबीरींमधेही शक्ती नव्हती.

© प्रशांत पटवर्धन.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers