■■ ...कॉलेजमध्ये पाऊल ठेवताना…... ■■
नवीन कॉलेज, नवीन मित्रमैत्रिणी याबाबत प्रत्येक तरुण-तरुणींमध्ये कमालीची उत्सुकता असते. कॉलेज कधी सुरू होईल, याचे वेध सर्वांनाच लागलेले असतात. पण महाविद्यालयीन जीवन यशस्वी होण्यासाठी कॉलेजमध्ये वावरताना काही बाबींचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. महाविद्यालयाची शिस्त पाळणे, विविध उपक्रमात सहभाग घेणे, वर्गांना नियमित हजेरी, वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या परीक्षा देणे यासारख्या गोष्टीबरोबरच अनौपचारिक शिक्षणही आपल्याला महाविद्यालयातून मिळत असते...
💁♂ पालकांच्या संपर्कात राहणे
शालेय अवस्था संपूण कॉलेजदशेत प्रवेश करताना आचार, विचार स्वातंत्र्याचा अनुभव आपण घेत असतो. आपल्यावर कोणतेही बंधन नसते. पण पाल्य कितीही मोठे झाले तरी पालकांना त्याची सतत काळजी असते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते घरी परत येईपर्यंत पालकांना त्याच्या स्थितीची सतत माहिती हवी असते. त्यामुळे मुलांनी पालकांच्या सतत संपर्कात राहावे. अचानक फिरायला, पिक्चरला किंवा मॉलमध्ये जायचे ठरले असेल तर हे बदल पालकांना कळवणे क्रमप्राप्त ठरते. यावेळी मोबाईल पुरेसा चार्ज केलेला असावा. कॉलेजजीवनात गेल्यानंतर आपल्या जुन्या-नव्या मित्रांचे नंबर पालकांना देऊन ठेवावेत.
💁♂ व्यायाम विसरू नका
प्रत्येक विद्यार्थी हा कॉलेज आणि क्लासचे शेड्यूल तयार करत असतो. मात्र स्वत:चा फिटनेस राहवा यासाठी व्यायामाला वेळ काढत नाही. दररोज किमान 30 मिनिटे तरी व्यायामासाठी, योगासनासाठी वेळ राखून ठेवावा. व्यायाम केल्याने शरिरातील ऊर्जा कायम राहते आणि काम करताना उत्साह टिकून राहतो. व्यायामाबरोबरच आहाराबाबतही आपण सजग असावे.
💁♂ असाईनमेंट वेळेत पूर्ण करा
कॉलेजमधील असाईनमेंट या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा घटक असतात. कॉलेजतंर्गत गुण मिळवण्यासाठी किंवा गुणवृद्धीसाठी असाईनमेंट वेळेवर दाखल करणे महत्त्वाचे आहे. त्यात थोडाही हलगर्जीपणा दाखवला तर असाईनमेंट सादर करण्याचा बोजा आपोआप वाढतो. साहजिकच अन्य विषयांकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच असाइनमेंट वेळोवेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
💁♂ व्यक्तिमत्त्व सुधारा
कॉलेजमध्ये आपण दररोज मित्र-मैत्रिणींना तसेच नवनवीन सहकाऱ्यांना भेटत असतो. अशा वेळी चारचौघात आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण या काळात बनवलेली इमेज तुमच्या पुढील कारकिर्दीवर परिणाम करणारी असते.
एकूणच काय, तर कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय करा, धिंगाणा घाला; पण त्याला मर्यादा असू द्या. एन्जॉयमेंट, दंगामस्ती यातच करिअरच्या टप्प्यावरील महत्त्वाचे असणारे हे दिवस वाया घालवू नका इतकेच !

No comments:
Post a Comment