EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Sunday, July 29, 2018

काही बोलायाचे आहे...*

काही बोलायाचे आहे...*

अपहरण हा शब्द आपणांस नवीन नाही . पैशासाठी लहान मुलांचे अपहरण , स्त्रीचे अपहरण करून बलात्कार , खंडणीसाठी उद्योजकाचे अपहरण , विमानाचे अपहरण करून अतिरेक्यानी अवास्तव मागणी केली ..या अशा बातम्या आपल्या नित्य वाचनात असतात. अपहरण म्हणजे आपल्याला इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्या घटकाला वेठीस धरणे असे ढोबळमानाने म्हणता येते. अपहरणाचे वेगवेगळ्या प्रकारात आणखी एका महत्वाच्या अपहरणाची नोंद झाली आहे. त्या अपहरणाविषयी थोडा संवाद करणे गरजेचा आहे...त्याविषयी.

*महामानवांचे अपहरण ....जी महान लोक आपल्या राष्ट्रांच्या जडणघडणीत अमुल्य योगदान देतात ती महान लोकं म्हणजे त्या त्या राष्ट्रांचे महामानव असतात. आपल्या देशातही असे महामानव बरेच आहेत. मुळात आपला देश जात , धर्म , भाषा , प्रांत अशा निरनिराळ्या विभागणीत विभागला असल्याने प्रत्येक विभागाला एक अथवा अधिक महामानव मिळालेले आहेत. आणि प्रत्येक विभागाची आपापल्या महामानवांप्रती निष्ठा आहे , अस्मिता आहे. महामानव हे खरे तर राष्ट्रांच्या अभिमानाचा विषय असतात. भारतात याबाबतीत जरा चित्र निराळे आहे. जात धर्म भाषा प्रांत या घटकांचा विशेष प्रभाव जनमाणसावर असल्याने त्या त्या महामानवांना त्या त्या विभागात अक्षरशः कोंडून ठेवले आहे. अपहरण खरेतर विरोधी लोक करत असतात. याची अनेक उदाहरण आहेत. पण मला इथे एक वेगळे मत मांडायचय. माझ्या मते महामानवाचे " पहिले अपहरण " त्याचे भक्त / अनुयायी करतात. भारतात तर हे चित्र अधिक ठळक आहे. शिवाजीराजे मराठ्यांचे , जोतीराव माळ्यांचे , बाबासाहेब बौद्ध / दलितांचे , टिळक ब्राम्हणांचे , अण्णाभाऊ मांग समाजचे अशी विभागणी स्पष्ट आहे. प्रत्येक जातीने आपापल्या महामानवांना आपापल्या समूहात कैद करून त्याचे " पहिले अपहरण " केले आहे. भगतसिंग पंजाबचा , सुभाषबाबू बंगालचे , जयप्रकाश बिहारचे असे प्रांतीय अपहरणेही आहेत. टागोर बंगालचे , सानेगुरुजी महाराष्ट्राचे , अमृता प्रितम पंजाबी अशी भाषीय विभागणी सुध्दा ज्ञात आहे.अशाच विभागण्या धर्मवार दाखवता येतील. मुद्दा हा आहे की , ह्या महामानवांच्या प्रतिभा आणि शौर्य हा संपूर्ण देशाच्या मालकीचा असताना मात्र त्या त्या समूहानी व घटकानी आपापले शिक्के त्यांवर मारले आहेत. हे कितपत योग्य आहे ?? ...हा महामानवांच्या कार्याला संकुचित करणारा अश्लाघ्य व्यवहार आहे. महामानवावर त्यांच्या विचाराचे विरोधक अपहरण नंतर करतात पण त्यांचे पहिले अपहरण त्यांचे समर्थक म्हणवणारेच करतात असे माझे स्पष्ट मत आहे. ( मतमतांतराला वाव आहे ) अपहरणाचा हा प्रकार महामानवाच्या विचारांचा पराभव आहे असे समजावे लागेल. कुणी मान्य करो ना करो , पण समर्थकांंचा हा व्यवहार अन्यायकरक निश्चितच आहे. हे अपहरण वर्षानुवर्षे सुरु आहेत व कदाचित अजून बराच काळ सुरुच राहील. हे कुठं तरी थांबवायला हवे. अन् याकरिता त्या त्या महामानवाच्या समर्थकांची दृष्टी व्यापक बनायला हवी. जात , धर्म , भाषा व प्रांत यापेक्षा राष्ट्र मोठे असते. महामानव हे राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात हे ध्यानात घ्यावे . लिंकन अमेरिकेचा , माओ चीनचा , मार्क्स जर्मनीचा , मंडेला आफ्रिकेचे जगात प्रतिनिधित्व करतात. तसेच आपले महामानवानी जगात " भारतीय प्रतिनिधित्व " करायला हवे. याकरिता पहिल्यांदा त्या त्या महामानवांच्या समर्थकांच्या कचाट्यतून महामानवाची मुक्तता गरजेची आहे. अन् खरेतर राष्ट्र बांधणीकरता आवश्यकही आहे.*

साथींनो..जॉर्ज बर्नाड शॉ एके ठिकाणी म्हणतात की , "महापुरुषांच्यात त्रुटी निर्माण करण्यासाठी विधात्याने त्याला समर्थकाचा वर्ग चिकटवला ". या बोलण्यातील उपरोध व आशय ध्यानात घेतला तर माझे सांगणे नक्कीच पटेल. समर्थकांनी कोंडलेले आणि घेरलेले महामानव मुक्त करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक महामानवाच्य नजरेसमोर प्रथम राष्ट्र असते नंतर समूह. खरेतर राष्ट्र हाच त्याचा " आपला समूह " असतो. असे असताना त्यांना छोट्या छोट्या घटकात बंदिस्त करणे म्हणजे महामानवांचे अपहरण नव्हे काय ?? तुम्हीच विचार करा.

*!! महामानव हे राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात...संकुचित घटकांचे नव्हे !!*

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers