केंद्र सरकारकडून धार्मिक अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत
विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज मुख्याध्यापकांनी भरून घ्यावेत,
असे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
याबाबत जैन सोशल फोरमने पाठपुरावा केला होता. शाळांकडून होत असलेल्या अडवणुकीबाबत
तक्रारही केली होती.
केंद्र सरकारकडून धार्मिक अल्पसंख्याक समाजातील
विद्यार्थ्यांसाठी राज्यात शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. ही योजना पहिली ते
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. केंद्र सरकारने प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीचे
२०१८-१९ साठी नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज
भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिष्वृत्तीचे अर्ज भरताना शाळांकडून
विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. शाळा पालकांना शिष्यवृत्तीचे अर्ज
भरण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करत नसल्याची तक्रार फोरमचे अध्यक्ष अभिजीत लुणिया
व महिला अध्यक्षा दीपाली कटारिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सरकारने
मान्यताप्राप्त सर्व शाळांना अल्पसंख्याक समुदायाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून
घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही शाळा मात्र असहकार्य करत आहेत. जवळपास
सर्वच शाळांत कम्प्युटर आहेत. त्यामुळे शाळांनी शिष्यवृत्तीचे अर्ज शाळेतूनच भरले
पाहिजेत असा नियम आहे. परंतु, शाळांनी या नियमाकडेही दुर्लक्ष
केल्याचे तक्रारीत म्हटले होते. जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी
इंग्रजी माध्यमाच्या शाळांना याबाबत सूचना द्याव्यात, सूचनांचे
पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी फोरमने केली होती. त्यानंतर मात्र
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी शाळांच्या
मुख्याध्यापकांची असून मुख्याध्यापकांनी अर्ज भरून घ्यावेत, असे
आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

No comments:
Post a Comment