EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Thursday, August 2, 2018

नाहीं आम्ही विष्णुदास


नाहीं आम्ही विष्णुदास ।करीत आस कोणांची ।।१।।
कां हे नष्ट करिती निंदा? ।
नेणों सदा आमुची ।।ध्रु.।।
असों भलते ठायीं मनें ।
समाधानें आपुलिया ।।२।।
तुका म्हणे करू देवा ।
तुझी सेवा धंदा तो ।।३।।

अर्थ व चिंतन -
गर्दीतून जाताना एकमेकांना धक्का लागतोच. खांद्याला खांदा लागतोच. मात्र एखाद्याच्या खांद्याला आधीच काहीतरी जखम असेल, तर मात्र त्याला धक्का लागल्यावर तो चिडतोच. ज्याचा धक्का लागला त्यानं तो जखम पाहून मुद्दाम लावलेला नसतो. गर्दीत धक्का लागणे ही सामान्य बाब. पण ज्यांना जखमा असतात, त्यांना मात्र त्रास होतो. ते धक्का लागणाऱ्याला काहीतरी प्रतिक्रिया देतातच.

असंच असतं सगळ्याच क्षेत्रात. काम करणारा करत असतो, कामचुकाराला हे 'लागत' असतं. कष्टाळू माणूस पुढं गेलेला पाहून 'आळशी' त्याच्यावर दात खातोच.

दुसऱ्या एका ठिकाणी जगद्गुरू तुकोबांनी सांगितलं आहे, की
पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता ।
सिंदळीच्या माथा तिडीक उठे ।।
"पतिव्रता स्त्रीची तिच्या 'पितिनिष्ठे' विषयी स्तुती केली, तर 'व्यभिचारी' स्त्रीच्या टाळक्यात 'तिडीक' उठतेच."

या सर्व प्रकारात कुणीही कुणाला डिवचलेलं नसतं. पण तरीही इतर कुणालातरी त्रास होतोच.

हीच गोष्ट 'वैष्णवांचा-वारकऱ्यांचा'ही बाबतीत वेळोवेळी अनुभवाला आलीच आहे. आणि हाच विषय जगद्गुरू तुकोबांनी या अभंगातून मांडला आहे. त्यांच्या घडण्यात 'घडलेल्या' गोष्टींविषयी ते अनुभव कथन करतात.

"आम्ही विष्णुदास लोक आहोत. वारकरी आहोत. आम्हाला कुणाचीही अपेक्षा नसते." कुणी हेच करा, तेच करा, हे नका करू, ते नका करू. असं आम्ही काही कुणावर दडपण आणत नाही. आम्ही करू तेच करा असा काही कुणाला आम्ही धाक दाखवत नाही.

पण तरीही "हे दुष्ट लोक आमची सदानकदा निंदा काच करत राहतात? हे मात्र काही कळत नाही." ज्ञान्यांनी भक्तांना नाव ठेवणे, एवढाच यांचा धंदा!

अरे आम्हा वारकऱ्यांना नाव ठेवणाऱ्यांनो, "आम्ही कुठंही असो? आम्ही आमच्या मनाने समाधानी आहोत ना!" आम्हाला आमच्या कामात समाधानी राहता येतं. तुम्ही कशाला त्रास करून घेत आहेत? आम्हाला आमचं जगू द्या.

काही दुष्ट लोक म्हणतात, 'यज्ञाने ईश्वर भेटतो. स्पष्टोच्चारानेच त्याला ऐकू येतं. कर्मकांडाने भेटतो. नवस-सायासाने भेटतो. तीर्थ वगैरे इत्यादी ठिकाणीच भेटतो.' पण आमचं मत थोडं वेगळं आहे. आमच्या विठ्ठलाला यातलं काही नको. 'मुखी नाम, हाती मोक्ष' अशी आमची 'साक्ष' आहे. एवढी साधी आमची पूजा आहे. आणि तेवढीच त्याला आवडते. उपवास, व्रत, विधी इत्यादींचीही त्याला गरज नाही. आमचा विठ्ठल 'मागणारा नसून देणारा आहे.'

म्हणून आम्ही विठ्ठलाची 'नामस्मरणातून सेवा' एवढंच करू. मग भलेही कुणी 'तुम्ही वारकरी लोक नामस्मरणाव्यतिरिक्त आणखी काही करतच नाहीत' असं म्हणत आमची निंदा करत असले, तरी आम्ही आमचं हे एकमेव कामच करत राहू. कारण, इतर कसलेही कर्मकांड न करता "देवा, 'तुझी सेवा करणे' हा एवढा एकच आमचा धंदा आहे." आणि आम्ही तेवढाच करू.

चिंतन - विजय गवळी ©


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers