करोत तपादि साधनें ।
कोणी साधो गोरांजनें ।।१।।
आम्ही न वजों तया वाटा ।
नाचू पंढरीचोहटां ।।ध्रु.।।
पावोत आत्मस्थिति ।
कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ।।२।।
तुका म्हणे छंद ।
आम्हां हरिच्या दासां निंद्य ।।३।।
अर्थ व चिंतन -
नामस्मरणाव्यतिरिक्त इतर कसलेच 'उद्योग' करू नये, हे सर्वच संतांनी आवर्जून 'वैष्णवांसाठी' केलेला बोध सर्वांनीच समजून घेण्यायोग्य आहे.
माणसानं 'स्वतःतल्या' ईश्वराला 'वर्ज्य साधनेच्या वाटेनं' त्रास करून घेऊन बाहेरच्या ईश्वराची भक्ती करण्याचा उपदेश वारकऱ्यांना संतांनी केलेला नाही. "न लगे मोल । देवा बोल आवडती ।।" देवाला पैसे नाही, तर भक्ताचे फक्त बोल आवडतात. हे तुकोबांनी आवर्जून सांगितलं आहे.
स्वतः तुकोबांसारख्या हरिच्या दासाने निंद्य म्हणून सांगितलेली साधनं जर वारकऱ्यांनी केली, तर पाप कुणाला? याचा विचार झाला पाहिजे.
तुकोबा म्हणतात, भक्तीसाठी "कुणी 'तप' करोत कि, आणखी इतर काही साधनं करोत. किंवा (ईश्वराची भेट घडेल अशी अपेक्षा ठेवून) कुणी 'आत्मदहन' करोत."
"आम्ही मात्र या असल्या मार्गानं जाणार नाही. आम्ही आपलं पंढरपूरच्या 'चव्हाट्यावर' (चौकात) 'विठ्ठल-विठ्ठल' म्हणत आनंदाने नाचत राहू."
"कुणी 'आत्मज्ञानाला' पावोत किंवा कुणी 'मुक्ती' उत्तम आहे म्हणोत." आम्हाला मात्र आत्मज्ञानही नको आणि मुक्तीही नको. आम्हा वारकऱ्यांना विठ्ठलनामावाचून इतर काहीही नको.
म्हणून शेवटी तुकोबा आवर्जून म्हणतात, "हरिभजनावाचून आम्हा वारकऱ्यांना इतर कोणत्याही गोष्टीचा 'छंद' असणे, हे 'निंदनीय' आहे."
तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे वारकऱ्यांना 'तप करणे, आत्मदहन करणे, आत्मास्थिति ला पावणे आणि मुक्ती मिळवणे तर दूरच, ती 'उत्तम' आहे' असं म्हणणे सुद्धा निंदनीय आहे.
"हरी 'मुखे' म्हणा, पुण्याची गणना कोण करी?" ही एकच ओळ अख्ख्या वैष्णव धर्माच्या 'पालन-विधीचा' नियम सांगते.
No comments:
Post a Comment