संतवाणी
लोभे गिळी फासा आमिषाच्या आशा।
सापडोनी मासा तळमळी।।
☸ अर्थ
गळाला लागलेल्या माशाचे उदाहरण मानवी जीवनासाठी सूचक आहे. अनेकदा लोभी माणूस
तात्पुरता फायदा पाहतो आणि त्याचे भविष्यकाळात होणारे जे दुष्परिणाम असतात,
त्यांचे भानच ठेवत नाही. त्याच्या अपयशाची, अधःपताची
वा विनाशाची बीजे त्याच्या या लोभान्धतेमध्ये रुजवायला सुरुवात झालेली असते.
वर्तमानातील लोभ भावी काळातील दुःखाचे कारण आहे, हे
आधीच ओळखता आले, तर मनुष्य दुःखाचे ते कारण निर्माणच होऊ देणार
नाही. खरे शहाणपण यातच आहे.
एखादा मनुष्य स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक संपत्ती जमा करतो, तेव्हा
सामान्यतः त्याने इतर काही जणांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचीत केलेले
असल्याची दाट शक्यता असते आणि त्याचे हे वर्तन समाजात शोषण आणि विषमता यांची
निर्मिती करते. अशा रीतीने समाजातील अनेक व्यक्तींचे आणि पर्यायाने एकूण समाजाचे
स्वास्थ्य नाहीसे करण्याला त्या व्यक्तीचा लोभ कारणीभूत होतो. इतरांचे स्वास्थ्य
नष्ट केल्यामुळे तो स्वतःला असुरक्षित मानून स्वतःच्या संरक्षणाचा कडेकोट बंदोबस्त
करू लागतो. त्या प्रक्रियेत त्याच्या मनावरील ताण वाढतो आणि अशा रीतीने इतरांच्या
दुःखाला कारणीभूत ठरलेला तो स्वतःही दुःखी होतो. याचा अर्थ लोभ टाळला असता तो
इतरांच्या दुःखालाही कारणीभूत होत नाही आणि स्वतःलाही दुःखाचा स्पर्श होऊ देत
नाही.
✍🏼 जगद्गुरू
संत तुकाराम महाराज

No comments:
Post a Comment