EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 20, 2018

सांटविले वाण

सांटविले वाण ।
पैस घातला दुकान ।।१।।
जें ज्या पाहिजे जे काळीं ।
आहे सिद्ध चि जवळी ।।ध्रु.।।
निवडिलें साचें ।
उत्तम-मध्यम-कनिष्ठाचें ।।२।।
तुका बैसला दुकानीं ।
दावी मोला ऐसी वाणी ।।३।।


अर्थ व चिंतन -
आज आपण तुकोबांच्या 'ऐसपैस' घातलेल्या दुकानात जाऊ. तुकोबा स्वतः दुकानात बसले असून, ते त्या दुकानात कोणता 'माल' विकत आहेत ते पाहू. आणि तो माल ते 'आला त्याला वाटतात' का 'गिऱ्हाईकाची परीक्षा होऊन' मग माल देतात, ते पाहू.

दुकान 'किराणा' मालाचं आहे खरं, पण त्यात वस्तू मात्र 'पोट भरण्याच्या' नसून 'मन भरण्याच्या' आहेत. मन भरलं म्हणजे आयुष्याचं चीजंच झालं म्हणून समजाना! तरीही मात्र, तुकोबा इथं येणाऱ्यांची 'विभागणी' करून त्या पद्धतीनं माल देतात. सोबतच 'कुणीही येऊद्या, तो रिकाम्या हातानं परत जाणार नाही. त्याला काहीतरी मिळणारच' ही सुद्धा खात्री तुकोबा 'दुकानाचा मालक' या अधिकाराने देतात.

याविषयी तुकोबा सांगतात, संतांचं ज्ञान मी साठवून ठेवलं. आणि त्या "साठवून ठेवलेल्या मालाचं 'ऐसपैस' दुकान घातलं."

"आणि या दुकानात ज्याला ज्यावेळी जे पाहिजे, ते देण्यासाठी मी तयार आहे. कारण सर्वच वस्तू अगदी मी जवळच ठेवल्या आहेत." या दुकानात कुणी यावं, याचं बंधन नाही. कधी यावं, याचंही बंधन नाही. मी कोणत्याही वेळी 'देण्यासाठी तयारच' असल्याची माहिती ते सर्वांना देतात.

'तुकोबांच्या दुकानात मी जाऊ का नको? किंवा 'जाण्यासाठी ही वेळ योग्य आहे की नाही?' हा विचार दुकानात जाणाऱ्या 'गरजवंताने' अजिबात करण्याची गरज नाही. हेच एक ठिकाण आहे जिथं 'गरजवंत' अभिमानाने जाऊ शकतो. बाकी गरजवंताला कुठंही जायचं म्हटल्यावर किती संकोच बाळगावा लागतो, हे सर्वांनाच माहीत आहे.

पुढे सांगताना तुकोबा म्हणतात, या कुणीही आणि कधीही. मात्र आले की 'मागू ते भेटेल' असं नाही. 'माझ्या दुकानात तर सगळं आहे', पण गिऱ्हाईकाला जेवढं-जेवढं पचेल, आधी तेवढंच मिळेल. तुम्हाला भक्तीचा माल 'ज्ञानासाठी हवा की पोटासाठी' याची आधी पारख करून निवड होईल. व "उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशी 'जातीच्या नव्हे तर' भक्तीच्या कसोटीवर निवड केली जाईल. अश्या पद्धतीनं खऱ्या-खोट्याची निवड होऊन" आणि नंतरच 'योग्य' वाटप होईल.

भक्तीचा माल घेतल्यावर 'शुद्ध आचरण' ही किंमत द्यावी लागेल. वस्तू फुकट मिळणार नाही, पण खिशात हात घालायचीही गरज नाही. "मी या दुकानात बसून आहे. जो 'जशी किंमत देईल' तीच वस्तू त्याला दाखवली जाईल."

तुकोबांच्या दुकानात जाणाऱ्याने आधी 'घ्यायची त्या वस्तूची किंमत (निष्ठेचा शब्द) आपण देऊ शकतो का नाही' हा विचार करून मगच दुकानात जायचं की नाही हे ठरवायचं. बाकी संकोच करायची गरज नाही. या तर खरं. नाहीतरी 'ओझं होईल एवढं' ते स्वतःच देणार नाहीत. झेपेल तेवढंच देतील. चला.......

अरे हो, हे दुकान कुठं आहे, हे सांगायचंच राहिलं. मला वाटतं, तुकोबांनी हा सर्व माल 'गाथेत' भरून ठेवला आहे. या मालाचं ठिकाण 'गाथा' आहे. मग ती गाथा 'घरात असू द्या की पंढरपुरात.' नाहीतरी एकदा का गाथेतून घेतलेला माल मिळाल्यावर माणूस पंढरपूर सोडून दुसरीकडं जाईलच कसा?

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers