काही बोलायाचे आहे...*
जगात प्रत्येक वस्तूला एक किंमत असते. ती किंमत
भागवली की ती वस्तू आपल्या मालकीची बनते. त्या वस्तूवरचा आपला मालकी हक्क कायमचा
अबाधित होतो. ही किंमत पैशाच्या रुपात असते. किंमत तेव्हाच देता येते जेव्हा
आपल्या आवाक्यात ती असते. आवाक्यात नसणाऱ्या किंमतीच्या वस्तू आपण घेऊ शकत नाही .
म्हणून किंमत नावाच्या गोष्टीला एक वजन असते. अशीच किंमत अन्य क्षेत्रातही द्यावी
लागते. तिची तयारी असणे फार महत्त्वाचे असते.
*किंमत
देण्याची तयारी....तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा , तिथे टिकून रहायला अथवा पुढे
जायला एक किंमत चुकवावी लागते . सामाजिक असो वा राजकीय , धार्मिक असो वा आर्थिक , सांस्कृतिक असो वा शैक्षणिक
प्रत्येक क्षेत्रात किंमत ही द्यावीच लागते . ही किंमत पैशाच्या रुपात द्यावी लागत
नाही . तिची एक खासियत असते. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे ती किंमत चुकवावी लागते .
प्रतिकूल परिस्थितीतल जगणे , कष्टाची
अमर्याद तयारी , घरादारावर
तुळशीपत्र ठेवण्याची तयारी ठेवावी लागते . ध्येय अथवा यश गाठण्याची ती पूर्वतयारी
असते. आणि ही तयारी चोखपणे पार पडली की तुम्ही समाजात " मान्यताप्राप्त
" होतात. ही मान्यता मिळविण्यासाठी बरेच गोष्टीना आयुष्यात तिलांजली द्यावी
लागते. समाजाचे भले करायला जाताना बहुतांशी वेळा वैयक्तिक जीवनाचे मात्र मातेरे
होत जाते हे कटू वास्तव आहे. प्रत्येकाला हा समतोल साधणे जमेलच अस नाही . चळवळ्या
बनणे म्हणजे खायची गोष्ट नसते. स्वतः चा संसार उघडा टाकून गावाचा संसार करण्याचा
हा प्रयोग असतो. आणि बहुतांशी कार्यकर्ते हा प्रयोग करतच जगतात. कळतनकळत का होईना
पण समाजाचा न्याय करताना बरेचदा आपल्या कुटुंबाशी आपण न्याय करत नसतो हे कधीतरी
मान्य करायला हवे. म्हणून आयुष्यभर समाजाच्या भल्यात झटलेला महान मनुष्य त्याच्या
महानपणाचा काही
वाटा आपल्या कुटुंबाला देताना आपण पाहतो. पण...पण सरलेला काळ पुन्हा आयुष्यात येत
नसतो. अशा या गोलचक्राबाबतीत काय करावे हा मोठा प्रश्न आहे. खरेतर हा कार्यकर्ता
जेव्हा समाजहिताचे कार्य करत असतो तेव्हा ते कार्य म्हणजे एक प्रकारचे "
सामाजिक उध्दारासाठी केलेले बलिदान " आहे याची नोंद घ्यायला हवी. समाजाच्या
भल्याकरता आपल्या वैयक्तिक जीवनाची दिलेली ती " किंमत " असते. अशी किंमत
मोजणारी आयुष्य ही समाजातील घटकाची आयुष्य उजळवत असतात. हे बलिदान वंदनीय आहे. पण
याला स्वकुटुंबाप्रती कळतनकळत झालेल्या अन्यायाची वेदनेची किनारही असते हे ध्यानात
ठेवायला हवे.*
साथींनो...एवढी मोठी किंमत दिल्यावर या लोकांना काय
मिळत असावे ? असा
प्रश्न साहजिकच आहे. परंतु " स्व " भल्याकरता झटणारी ही लोकच नसतात
मुळी. अवघा समाजच यांचे कुटुंब असते. आणि अशा प्रामाणिक भावनेनेच ते कार्यरत
असतात. वंदनीय होणे हे सोपे नसतेच मुळी. याकरिता मोठा वैयक्तिक त्याग करावा लागतो.
अन् ही " किंमत " मोजलेशिवाय समाजात दखलपात्र होणे सुध्दा कठीणय हेही
तितकेच खरं . शेवटी हा आपल्या जीवन ध्येयाप्रती असणाऱ्या आपल्या एकूण
दृष्टिकोनावरच अवलंबून आहे. किंमत देण्याची तयारी आहे की नाही यावर बरेच काही ठरत
असते...एवढेच .
*!! महानपणाची
पूर्वअट....किंमत देण्याची तयारी हवी !!*

No comments:
Post a Comment