तुकास्र - 107
संत तुकारामांचे सुविचार
आपुलिया हिता, जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ।।
अर्थात
“सन्मार्गानं स्वतःच्या भल्याविषयी
जो नेहमी जागरूक असतो,
याविषयी त्याच्यावर संस्कार करणारे,
त्याचे आईवडीलच खऱ्या अर्थाने धन्य होत.”
मुलाच्या बेजबाबदार वागण्याबद्दल,
समाज त्याच्या आईवडिलांना दोषी ठरवतो.
पण त्यासोबतच ‘जी मुलं कर्तव्यनिष्ठ राहून
स्वतःच्या प्रगतीचा विचार करतात, सन्मार्गानंच भलं होणार असं मानून त्या
वाटेनं जातात, स्वतः मोठी होतात, समाजाला
मोठं करतात, राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावतात, आणि
विशेष म्हणजे हे सर्व ते ठरवून, जागृत राहून करतात- खरं तर ह्या सर्व
गोष्टींचे त्यांच्यावर जाणीवपूर्वक संस्कार करणारे त्यांचे आईवडीलच धन्य आहेत.
समाजाने कर्तृत्ववान मुलांसोबतच त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा आभार मानले पाहिजे.
त्यांनी कर्तबगार मुलं घडवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
आपल्या कर्तबगारीनं ‘शिवरायांनी’ इतिहास घडवला
असला तरी, या इतिहास पुरुषाला घडवणारे ‘शहाजी राजे आणि
राष्ट्रमाता जिजाऊ’ या आईवडिलांच्या उपकाराची जाणीव समाज ठेऊन आहेच.
‘डॉ. बाबासाहेबांना शिक्षण क्रांतीसाठी घडवणारे
‘सुभेदार रामजी’ हे त्यांचे वडील आणि संत तुकारामांचा सर्वात लहान सातव्या
क्रमांकाच्या मुलाला- ‘नारायण’ यांना वडिलांच्या म्हणजेच तुकोबारायांच्या पाऊलावर
पाऊल ठेवून वारकरी मार्गानं चालायला लावणाऱ्या नारायण बाबांच्या आई जिजाई उर्फ
आऊली (तुकोबाराय आपल्या दुसऱ्या पत्नी जिजाईंना -आपल्याला त्या देत असलेल्या प्रेमाच्या
बदल्यात लाडानं ‘आऊली’ म्हणायचे) यांच्याही उपकाराचे भान समाजाला मोठ्या प्रगतीवर
घेऊन जातील.

No comments:
Post a Comment